"कुणबी" हा शब्द "कुणा" आणि "बी" या दोन शब्दांच्या संयोगातून निर्माण झालेला आहे. कुणा म्हणजे माती कुणा ला "लोक" म्हणून सुध्दा संबोधले जाते तर दुसरीकडे बी म्हणजेच बियाने होय. म्हणूनच मातीत बी पेरून एका दाण्याचे जो हजार दाणे निर्माण करतो त्या "शेतकरी समाजास कुणबी" म्हणतात. पुर्वीपासूनच धनोजे कुणबी समाज महाराष्ट्रत नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्हयात तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा, भोपाल व रायपूर जिल्हयातील खेडयापाडयात विखुरलेला होता. समाजाच्या तळागाळातील समाज बांधवांना एकत्र करून सर्वांगीन विकास करण्याच्या हेतूने शिक्षण आणि नोकरी संबंधाने शहरात वास्तव्यास असलेल्या तत्कालीन समाज सुधारकांनी सन 1972 मध्ये नागपूरात राष्ट्रीय सेवक मंडळाची स्थापना करून चळवळ उभी केली होती. त्यानंतर 1979 मध्ये कुणबी धनुज समाज मध्य प्रदेश भोपाल, सन 1985 मध्ये धनोजे कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ जि.नागपूर (केंद्र सावनेर) सन 1994 मध्ये अखिल भारतीय धनोजे कुणबी समाज नागपूर ची स्थापना झाल्याने समाज कार्यास खऱ्या अर्थाने गती मिळाली. पुढे सावनेर, कळमेश्वर, बुट्टीबोरी, चंद्रपूर, गोंडपिपरी ईत्यादी ठिकाणी सुध्दा समाजाची मंडळे व शाखा निर्माण होवून समाज कार्य जोमाने सुरू झाले. कालांतराने नागपूर जिल्हयातील समाज कार्याचा उत्साह कमी होउन कार्यास उतरती कळा लागल्याने समाजातील जेष्ठ मंडळी सोबत विचारमंथन केले. समाज कार्यास पदाधिकाऱ्यांसोबतच कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे हे ओळखून ती कमी दुर करण्या करीता आम्ही विविध ठिकाणी जुलै 2018 पासून "धनोजे कुणबी समाज सेवा संघ नागपूर" (व्हाटस्अप ग्रुप) ची निर्मीती केलेली आहे.